मावळ आणि शिरूर लोकसभेसाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; प्रत्येक बुथवर २५ प्रशिक्षित कार्यकर्ते

0
3251

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पक्षाने संघटनात्मक बांधणीवर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे. मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र क्षेत्रप्रमुख, प्रत्येक विधानसभेसाठी विस्तारक, प्रत्येक मतदान केंद्रासाठी शक्ती केंद्रप्रमुख, एका बुथसाठी २५ कार्यकर्ते आणि मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी स्वतंत्र कार्यकर्ता ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची वैशिष्ट्ये असून संघटनात्मक बांधणीचा कालबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका अजितदादांच्या ताब्यातून काबिज केल्यानंतर आता भाजप मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुसाठी युती न झाल्यास मावळ आणि शिरूरचा गड जिंकण्याच्या उद्देशाने भाजपच्या नेत्यांची पावले पडू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने कालबद्ध कार्यक्रम ठरवला आहे. पक्षाचा हा कालबद्ध कार्यक्रम लोकसभा निवडणूक होईपर्यंत कायम राहणार आहे.

नवमतदार नोंदणी, मतदार याद्यांचे वाचन, बुथप्रमुखांचे प्रशिक्षण, मतदार यादीतील पान प्रमुखांचे प्रशिक्षण, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत मेळावे, ग्रामीण भागात तालुकास्तरावर बुथप्रमुखांचे अभ्यासवर्ग घेण्याचे पक्षाचे नियोजन आहे. लोकसभेच्या तयारीसाठी एक लोकसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी विस्तारक काम करणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रासाठी शक्ती केंद्रप्रमुख, एका बुथसाठी २५ कार्यकर्ते (त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करणारे ५, दुचाकी वापरणारे ५ आणि ५ महिला व ५ युवकांचा समावेश आहे.)

याशिवाय सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. परंतु, दोन्ही मतदारसंघांत भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. त्यामुळे युती झाली तरी या दोन्ही मतदारसंघांवर भाजप दावा करणार आहे. राजकीय चर्चेतून दोनपैकी एक मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच युती न झाल्यास दोन्ही मतदारसंघात राजकीय ताकद पणाला लावण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमांद्वारे भाजप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.