मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचा घाम फोडला; दोन्ही मतदारसंघात पैशाच्या उधळणीवरच जय-पराजय ठरणार

0
1732

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरूवातीला शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना घाम फोडल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे दोन्ही खासदार विजयासाठी झुंजत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः शिरूर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, आता तशी चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही जोर लावल्यामुळे मावळ मतदारसंघ तिसऱ्यांदा राखणे शिवसेनेसाठी वाटते तेवढे सोपे नाही. आता प्रचाराचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात पैशाची किती आणि कशी उधळण होते यावरच मावळ आणि शिरूर मतदारसंघात जय-पराजय ठरेल. तसेच दोन्ही मतदारसंघातील विजय हा निसटत्या मतांचाच असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. प्रचाराचे शेवटचे तीनच दिवस शिल्लक आहेत. शनिवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील. या दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजितदादांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात, तर शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अभिनेते व राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे पारंपारिक बालेकिल्ले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेने सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवला आहे.

शिवसेनेच्या पारंपारिक बालेकिल्ल्यासोबतच दोन्ही मतदारसंघात भाजपची ताकदही मोठी आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूरमध्ये काहीही झाले तरी शिवसेनाच विजयी होईल, असे छातीठोकपणे सांगितले जात. परंतु, गेल्या महिनाभराचा प्रचार पाहिल्यास दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेलच याची खात्री देता येईल, अशी स्थिती राहिलेली नाही. सुरूवातीला दोन्ही मतदारसंघात शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी लढत आता चुरशीची बनली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्चितीला उशीर होऊनही आणि उमेदवार निश्चितीनंतर आता काही खरे नाही, असे म्हणण्यासारखी स्थिती निर्माण होऊनही राष्ट्रवादीने प्रचारात मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना घाम फुटल्याचे चित्र आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय अगदीच सोपा मानला जात होता. परंतु, आता आढळराव पाटील निवडून येतील की नाही, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या बालेकिल्ल्याला प्रत्येक ठिकाणी भगदाड पाडले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेचे रान पोखरले आहे. शिवसेनेचा प्रचार करत असलेली अनेक मंडळी आतून घड्याळ चालवत असल्याचे उघड राजकीय गुपित आहे. त्यातच अमोल कोल्हे यांची “क्रेझ” राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील १५ वर्षे खासदार असूनही कोणतीच मोठी विकासकामे केली नसल्याची नाराजी ग्रामीण जनतेत स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघात हातात धनुष्य आणि मनात घड्याळ असे चित्र आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटील प्रयत्नांची शिकस्त करून हे चित्र पालटवण्यात यशस्वी होतात का?, हे पाहावे लागणार आहे.

मावळ मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीने प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र आहे. अजितदादांचे पुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा सगळीकडे जोमात प्रचार सुरू आहे. शिवसेनेचाही प्रचार जोमात सुरू असला तरी काहीही झाले तरी आपणच निवडून येणार या भ्रमात शिवसेना वागताना दिसत आहे. पार्थ पवार यांच्या विजयासाठी स्वतः शरद पवार आणि अजितदादा राजकीय पटलावर बुद्धिबळ खेळत आहेत. त्यांच्या दिमतीला अनेक दिग्गज मैदानात उतरल्याचे चित्र येत्या दोन दिवसात पाहायला मिळू शकते. त्यामुळे शिवसेनेला भ्रमात राहणे महागात पडल्यास आश्चर्य वाटायला नको. आता पुढील तीन-चार दिवस राष्ट्रवादीकडून खरा राजकीय खेळ होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला मावळमध्ये विजय वाटते तेवढे सोपे नाही. अशा परिस्थितीत पैशांचा खेळही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. शेवटच्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून पैशाची किती आणि कशी उधळण होते यावर सुद्धा मावळ आणि शिरूर मतदारसंघाचा जय-पराजय ठरू शकतो. दोन्ही मतदारसंघातील विजय हा निसटत्या मतांचाच असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.