मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांची तगडी तयारी; ३५ संवेदनशील बुथवर असणार करडी नजर

0
602

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाकरिता सोमवारी (दि. २९) होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तगडी तयारी केली आहे. दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून बंदोबस्तासाठी एकूण ३ हजार ५००  पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत एकूण ३६५ मतदान केंद्र असून, त्यामध्ये १ हजार ६७१ बूथ आहेत. ज्यापैकी ३५ बूथ हे संवेदनशील आहेत. या संवेदनशील भागात विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बालेवाडी येथील स्ट्राँग रूमपासून डिस्पॅच सेंटरपर्यंत आणि डिस्पॅच सेंटरपासून मतदान केंद्रापर्यंत ईव्हीएम मशिन पोचविण्याची जबाबदारी सहायक आयुक्‍त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. अशाच प्रकारे मतदान झाल्यानंतर या पेट्या मतदान केंद्रापासून डिस्पॅच सेंटर आणि त्यानंतर स्टाँग रूमपर्यंत पोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.