‘माळीणप्रमाणे तिवरे दुर्घटनाग्रस्तांचे पूनर्वसन करा’- शरद पवार

0
536

मुंबई, दि. १० (पीसीबी) – रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या ठिकाणी जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य सरकाकडून देण्यात आलेली ४ लाखांची आर्थिक मदत ही तुटपुंजी आहे. धरणफुटीमुळे केवळ पीकच वाहून गेले नाही तर शेतजमीन सुद्धा वाहून गेली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तिवरे धरणग्रस्तांचे माळीण दुर्घटनाग्रस्तांप्रमाणे पूनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ८ जुलै रोजी तिवरे दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मृत कुटुंबीयाच्या नातेवाईकांना ४ लाखांचे सानुग्रह अनुदान वाटप केले असले तरी हे अनुदान पुरेसे नाही. शेतकऱ्यांचे केवळ पीकच वाहून गेले नाही तर जमीनही लागवडीयोग्य राहिली नाही. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. मृत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची व्यवस्था करावी, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, रस्ते, पूल वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात याव्यात. बाधीत कुटुंबाचे धरणापासून दूर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून त्यांचे योग्य पूनर्वसन करण्यात यावे, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून अनुदान देण्यात यावे. पुणे जिल्ह्यात झालेल्या माळीण दुर्घटनेवेळी तत्कालीन सरकारने तातडीने मतदकार्य केले होते. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून बाधीत कुटुंबांना मदत केली होती. शासनाच्या प्रचलित योजना प्राधान्यक्रमाने राबवल्या गेल्या. त्याच अनुषंगाने तिवरे गावातील ग्रामस्थ व बाधीतांच्या मागण्यांचा विचार करण्यात यावा, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.