मोदींविरोधात बोलल्यानेच माझ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; संजीव भट्ट यांच्या पत्नीचा आरोप

0
359

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलत असल्या कारणानेच माझ्या पतीला टार्गेट करण्यात आल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याच्या पत्नीने केला आहे. गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताब्यात असणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजीव भट्ट याच्यासोबत अजून एक पोलीस अधिकारी प्रवीण सिंह यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संजीव भट्ट याची पत्नी श्वेता आणि मुलगा संजीव यांनी मंगळवारी मुंबईत ‘कॅम्पेन फॉर जस्टिस’ या आपल्या मोहिमेअंतर्गत काही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजीव भट्ट याने २००२ गुजरात दंगलीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांनी परिस्थिती योग्य रितीने हाताळली नसल्याचे त्याने म्हटले होते. २०१५ रोजी गृहमंत्रालयाने संजीव भट्टवर निलंबनाची कारवाई केली होती. कर्तव्यावर गैरहजर राहण्याचा ठपकाही त्याच्यावर लावण्यात आला होता.

श्वेता भट्ट यांनी सांगितल्यानुसार, ‘१९९० रोजी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर उसळलेल्या दंगलीप्रकरणी जेव्हा १३३ लोकांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा संजीव भट्ट तेथून फार दूर होते. तो परिसर त्यांच्या अख्त्यारित नव्हता. संजीव यांनी १३३ जणांना ताब्यात घेतले होते हे सिद्ध करणारा एकही पोलीस साक्षीदार नाही’. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘सप्टेंबर २०१८ रोजी पोलीस आमच्या घरी आले आणि माझ्या पतीला अटक केली. त्यांना कधीच जामीन मिळाला नाही. हे सर्व फक्त मोदींविरोधात बोलले यामुळेच. आमची सुरक्षा काढून घेण्यात आली. जानेवारी महिन्यात होणाऱ्या जामिनाच्या सुनावणीआधी एका ट्रकने माझ्या कारला धडक दिली आणि दुभाजकापर्यंत फरफटत नेले होते. त्या रस्त्यावर अवजड वाहनांना परवानगीच नव्हती’.