मालमत्ता कर थकल्याने नळ कनेक्शन कोणत्या नियमानुसार तोडले? विकास डोळस यांचा सवाल

0
189

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांची मालमत्ता ‘सील’ करण्याऐवजी कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन ऐन उन्हाळ्यात नळ कनेक्शन तोडले आहेत. एखाद्याने पाणीपट्टी भरली असली तरी मालमत्ता कर थकल्याने नळ कनेक्शन तोडणे कोणत्या नियमाला धरून आहे? असा सवाल माजी नगरसेवक विकास डोळस यांनी केला. तसेच तोडलेले नळ कनेक्शन तत्काळ जोडून देण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, महापालिकेने कर वसूल केला पाहिजे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे कर वसूल करण्याबाबत आमची काहीच हरकत नाही आणि नसेल देखील पण कारवाई करताना कर संकलन व कर आकारणी विभागाने कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन कारवाई करणे अतिशय चुकीचे आहे. मालमत्ता कर थकल्यामुळे मालमत्ता ‘सील’ करण्याचा अधिकार कर आकारणी विभागाला आहे. पण, या विभागाकडून मालमत्ता ‘सील’ करण्याबरोबरच नळ कनेक्शनही तोडले जात आहे. मालमत्ता कर थकला म्हणून नळ कनेक्शन तोडण्याचा कोणताही अधिकार या विभागाला नाही. असे असताना आजपर्यंत 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले आहेत. कोणत्या नियमानुसार हे नळ कनेक्शन तोडले आहेत.

एखाद्याने पाणीपट्टी भरली असली तरी मालमत्ता कर थकल्याने नळ कनेक्शन तोडणे कोणत्या नियमाला धरून आहे? याचे कोडे उलगडत नाही. कोण काही बोलत नाही म्हणून प्रशासन मनमनी पद्धतीने कारभार करू शकत नाही. एखाद्याने पाणीपट्टी भरूनही त्याचे नळ कनेक्शन तोडणे अतिशय चुकीचे आहे. नळ जोडून घेण्यासाठी नागरिकांना पुन्हा प्लंबरकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यात आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होते. त्यामुळे मालमत्ता कर थकल्याने तोडलेले नळ कनेक्शन तत्काळ जोडून द्यावेत. कर थकल्याने नळ जोडण्याची कारवाई करू नये असे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी डोळस यांनी निवेदनातून केली आहे.