मानहानी खटल्यात राहुल गांधींना जामीन

0
398

पाटणा, दि ६ (पीसीबी) – कर्नाटकमधील एका प्रचार सभेत वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत सापडलेले काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात जामीन मिळाला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. 

पाटणामधील मुख्य न्यायदंडाधिकार न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. कोर्टाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर केला. राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस  कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली होती. राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा परत घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली

आज सुनावणीच्या आधी राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाटणाच्या कोर्टात हजर राहणार आहे. भाजप आणि आरएसएसमधील माझ्या राजकीय विरोधकांनी मला त्रास देण्यासाठी आणि मला धमकावण्यासाठी माझ्याविरुद्ध आणखी एक प्रयत्न केला आहे. सत्यमेव जयते. असे ट्विटरवर लिहिले होते. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?’ असं वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील एका प्रचार सभेत केले होते. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला भरला होता.