माढ्यात राजकीय नाट्य; काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

0
559

पंढरपूर, दि. १० (पीसीबी) –  लोकसभा निवडणुका अक्षरशः हाकेच्या अंतरावर असताना नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आहे. माढ्याची निवडणूक तर दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालली आहे. माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिले.

माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा रात्री पार पडला. या मेळाव्याला संपूर्ण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. ‘यावेळी परिस्थिती वेगळी असून आपण काँग्रेसवर जरी नितांत प्रेम करत असलो, तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली’ असे गोरे म्हणाले.

‘ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करावेस वाटते, त्यांनी हात वर करावा’ असे आवाहन जयकुमार गोरे यांनी केले. मात्र कोणीही हात वर न केल्यावर ज्यांना रणजित निंबाळकर यांना मतदान करावेसे वाटते, त्यांना हात वर करण्याचे आवाहन करताच सर्वच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत हात वर केले. अशाप्रकारे गोरे यांनी यंदा भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्या मागे राहण्याचे संकेत दिले.