माझ्या हिम्मतीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; नितीन गडकरींचा राहुल गांधींवर पलटवार

0
891

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – माझ्या हिम्मतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही तुम्हाला पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी दुसऱ्यांचे खांदे शोधावे लागत आहेत. माध्यमांनी ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा तुम्हाला आधार घ्यावा लागत आहे, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांना  लगावला आहे.

गडकरीजी तुमचे कौतुक! भाजपामध्ये थोडेफार  धाडस असलेले तुम्ही एकमेव नेते आहात. आता राफेल घोटाळा, अनिल अंबानी, शेतकऱ्यांमधली अस्वस्थतता, संस्थांचे नुकसान यावर सुद्धा काहीतरी बोला, असे राहुल यांनी उपरोधिकपणे गडकरींना म्हटले होते.  यावर गडकरी यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये टॅग करत म्हटले आहे की, माझ्या हिम्मतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.  पण आश्चर्य याचे वाटते की, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला माध्यमाकडून ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे.  हे मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे की, तुम्हाला आमच्यावर हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत.