माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

0
448

नवी दिल्ली, दि.१४ (पीसीबी) – मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाल्याचे दिसत आहे, असं म्हटले होते. या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे.

राहुल गांधी पुढे म्हटले की, मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही, मी मरेन पण माफी मागणार नाही. मात्र, मीच काय, पण काँग्रेसमधील कोणीही माफी मागणार नाही.’ ‘जर कोणाला माफी मागायची आहे. तर नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदीबरोबर त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनी देशाची माफी मागायला हवी.

या देशाची शक्ती या देशाची अर्थव्यवस्था होती मात्र आज ती राहिलेली नाही. संपूर्ण जग मिळून भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करत होतं. जग आशियाचे भविष्य चीन आणि भारत असल्याचं सांगत होतं. त्यामुळे या शक्तीला ‘चिंडिया’ नावानं संबोधलं जात होतं. मात्र, आता आपण दोनशे रुपये किलोनं कांदा विकत घेत आहोत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवली आहे.

तुम्ही देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना निवडून दिले. देशाची प्रगती करण्यासाठी, जीडीपी वाढवण्यासाठी, पण त्यांनी काय केले, असा प्रश्नही राहुल गांधीनी उपस्थितांना विचारला.