माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणा-या दाखले विरोधात आणखी एक गुन्हा माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
296

काळेवाडी, दि. १३ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणा-या युवराज दाखले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कारणासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली. पत्नीने त्यासाठी नकार दिला असता दाखले आणि त्याच्या घरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याचे हे प्रकरण असून ही घटना 20 नोव्हेंबर 2008 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.

युवराज भगवान दाखले (वय 35), सासरे भगवान येडबा दाखले (वय 60), सासू पुतळाबाई भगवान दाखले (वय 56, तिघे रा. तापकीर चौक, काळेवाडी), नणंद चांदणी रामचंद्र शेंडगे (वय 36), रामचंद्र दशरथ शेंडगे (वय 40, दोघे रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने सोमवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत विवाहीतेकडे वेगवेगळ्या कारणांसाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी तिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

युवराज दाखले याने 2 मार्च रोजी युट्युबवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केला. प्रसारित केलेल्या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखले याच्याकडे नसताना हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. यामुळे एका महिलेने त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप दाखले याने व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. या प्रकरणाचे थेट विधानसभेत पडसाद उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी दाखले याला अटकही केली होती.