महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर राजकीय मैदानात; भाजपकडून लोकसभा लढवणार ?  

0
883

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि फलंदाज गौतम गंभीर हे दोघे २०१९ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.    गंभीरला दिल्लीतून तर धोनीला झारखंडमधून तिकीट देऊन राजकीय मैदानात उरण्याची तयारी भाजपने केल्याचे समजते.भाजप दिल्लीच्या खासदार मिनाक्षी लेखी यांच्या जागी  गंभीरला संधी देऊ शकते. कारण लेखी यांच्या कामाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी समाधानी नाहीत.  

मिनाक्षी लेखी यांच्या कामावर तसेच त्यांच्या पक्ष नेतेपदावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यामुळे भाजपाचे उमेदवार म्हणून दिल्लीतील मतदारसंघातून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. मात्र, याच जागेसाठी गौतम गंभीर हा भाजपासाठी सर्वाधिक चर्चेत राहणारा उमेदवार ठरेल. गंभीरला सर्वांची पसंती मिळू शकते तसेच त्याच्या सामाजिक कार्यासाठी देखील तो जनमानसांत ओळखला जातो. तो स्वतः दिल्लीकर असल्याने आपल्या लोकांसाठी तो चांगले काम करु शकतो.

त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशीही भाजपने लोकसभा लढवण्याबाबत बोलणी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. भाजपा या दोन्ही स्टार खेळाडूंच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण देशभरात त्यांना घेऊन भाजपा प्रचार मोहिमा आखू  शकते. हे दोघेही त्यांच्या राज्यांपुरतेच नव्हे तर देशाचेही प्रतिनिधित्व करतात. धोनी सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.  त्यामुळे दक्षिणेतही त्याचा चाहता वर्ग तयार झाला आहे.