महाविकास आघाडीने निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा घेतला निर्णय

0
333
इंदापूर, दि.२० (पीसीबी) – भाजप सरकारने निरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर तालुक्याचे पाणी बंद केले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द करुन, निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बुधवारच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला. 
राज्यमंत्री दत्ता भरणे म्हणाले, निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे, शिल्लक राहणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा  निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा  फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल डाव्या कालव्यात ५५ % आणि उजव्या कालव्यात ४५ % पाणी सोडण्यात येणार आहे. निरा डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील काही गावे येतात, तर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात पंढरपूर, सांगोला, खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यांचा समावेश आहे. हे पाणी पिण्यासाठी, औद्योगिक आणि शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. “भाजपा सरकारच्या काळात इंदापूर, बारामतीचे पाणी बंद केले होते.  ते आज महाविकास आघाडी सरकराने निर्णय घेत परत दिल्याबद्दल आनंद आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो” असे राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले.
निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.