स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपतीपदक

0
288
जालना, दि.२० (पीसीबी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
राजेंद्रसिंह गौर हे नांदेड  जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी परभणी येथील कृषी विद्यापिठातून बी.एस.सी कृषी ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे. १९९२ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी सहा पारितोषिके मिळविली होती. परिविक्षाधीन काळात लातूर जिल्ह्य़ात झालेल्या भूकंपाच्या वेळी त्यांनी कर्तव्य बजावले होते. किल्लारी, बाळापूर, औरंगाबाद, सोलापूर, हिंगोली इत्यादी ठिकाणी त्यांनी आतापर्यंत सेवा बजावली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दहशतवादी विरोधी पथक इत्यादी विभागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
मुंबई येथील राज्य पोलीस मुख्यालयात यानिमित्ताने आयोजित अलंकरण समारंभास गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.