महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

0
544

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – एनडीआरएफच्या चार तुकड्या, वायुदल आणि नौदल यांच्या मदतीने वांगणी जवळ अडकलेल्या मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील १०५० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यात ९ गर्भवती महिलांचाही समावेश होता.

शुक्रवारी रात्रीपासून ही महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी जवळ अडकली होती. आज (शनिवार) सकाळपासून एनडीआरएफ, वायुदल आणि नौदलाच्या पथकाने बचाव कार्याला सुरूवात केली होती. वायुदलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुपारी सव्वादोनपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आले. त्यानंतर १४ बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये १०५० प्रवासी अडकले होते ज्यांची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले घटनास्थळी आले होते. दुपारनंतर  हळूहळू पाणी ओसरु लागले. या सगळ्या दरम्यान प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहनही करण्यात आले होते. कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही पुण्याजवळ थांबवण्यात आली होती.