महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊन जवळपास निश्चित, काय बंद काय चालू…

0
532

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊनच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊनचे संकेत दिले, त्यानंतर लाॅकडाऊनच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात भाजपने लाॅकडाऊनला कडाडुन विरोध केल्यानंतर सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीनेही विरोध करत महाराष्ट्रात लाॅकडाऊन गरजेचा नसुन आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं बोलुन दाखवलं होतं. तसेच ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे 15 दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची पूर्ण साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं.

महाराष्ट्रात मर्यादित स्वरूपात लाॅकडाऊन लावण्यात यावा तसेच त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांनी तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्यानंतर आता 2 एप्रिलपासुन महाराष्ट्रात मर्यादित स्वरुपाचा लाॅकडाऊन लावण्यात येऊ शकतो. नवीन नियम लागू करून हा लाॅकडाऊन केला जाऊ शकतो. ज्यामध्ये गर्दीची ठिकाणं ही पुर्णपणे बंद केली जातील. ज्यामध्ये वेळ घालवण्यासाठी जात असलेल्या विविध जागांचा समावेश असु शकतो.

एका विशिष्ट वेळेत अन्नधान्याची दुकानं उघडी ठेवली जाऊ शकतात, जिल्ह्याच्या सिमा सुरूवातीला बंद केल्या जाणार नाही पण, परिस्थिती खराब झाल्यास तो ही निर्णय घेतला जाऊ शकतो आणि नविन लाॅकडाऊन हा आधीच्या लाॅकडाऊनपेक्षा वेगळा आणि अर्थव्यवस्थेला फटका बसेल असा न करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय हा लाॅकडाऊन सुरूवातीला 7 ते 8 दिवसांसाठी लागु केला जाऊ शकतो, अशी माहीती मिळत आहे.

नाईट कर्फ्यु लावुन काही शहरांमध्ये कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आता दिवसा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत कर्फ्यु लागण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा वाहतुक बंद केल्यास त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होईल म्हणुन सरकार त्यादृष्टीने विचार करून निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच आता रेल्वे स्टेशन, बस-स्थानक, विमानतळ या ठिकाणी कोरोना चाचण्या करून कोरोनाबाधित रूग्णांना त्वरीत वेगळं करून कोरोनाची साखळी तोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच या सर्व गोष्टींचा खुलासा होईल, त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे.

गर्दीची ठिकाणं पूर्ण बंद ठेवण्याची चिन्हं
आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाणं कुठली तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणं बंद केली जातील.

मागील लॉकडाऊन हा सलग होता. म्हणजे, 24*7 सगळं बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे

भाजीपाला, किराणा मिळणार का?
मग प्रश्न येतो, भाजीपाला, किराणा आम्हाला मिळणार का? की हा आधीच भरुन ठेवायचा? तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरु राहणार का?
काहींचा प्रश्न असाही असू शकतो, की मागील वेळी जशा आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सुरुवातीला तरी असं केलं जाणार नाही. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असं सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान होतं. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

बसस्टँडपासून रेल्वेस्टेशनपर्यंत कोरोना चाचण्या करण्याचं नियोजन
हेच नाहीतर रेल्वेस्टेशन्स, विमानतळं, बसस्थानकं इथं कोरोना चाचण्या करण्याचंही धोरण सरकारने ठरवलं आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांन वेगळं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करतंय.

एकूणच लॉकडाऊनचा अर्थ वर्षभरात बदलला आहे. अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागलाच, तर त्याचं काटेकोरपणे पालनही गरजेचं आहे.