महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा – अरविंद सावंत

0
733

मुंबई,दि.२९(पीसीबी) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला असून पुढील आदेश मिळेपर्यंत दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर, “शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांची गाठ शिवसेनेशी आहे. महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे”, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी दिला आहे.

“कन्नड वेदिका संघटना आहे की वेडीका संघटना….ती वेड्यांचीच संघटना आहे. महाराष्ट्राला नेहमी आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला आहे. बेळगाव, कारवार निपाणीमधील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. मराठी माणसावर पराकोटीचा अन्याय कर्नाटक सरकारने केला आहे. पण महाराष्ट्राने प्रतिक्रिया कधीही दिली नाही”, असं अरविंद सावंत टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच कर्नाटकात कन्नड वेदिका संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमाप्रश्नाला उकळी फुटल्यानंतर दोन्ही राज्यातील समर्थक आपली भूमिका मांडत रस्त्यावर उतरत आहेत.