महाराष्ट्राच्या आणखी एका जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारण्यात येणार

0
230

सातारा,दि.१९(पीसीबी) : आता राज्यातील सातारा जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी मधील मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे आता एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. तर हणबरावाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.

मागील १५ दिवसांपूर्वी देशात बर्ड फ्लूने शिरकाव केला. अनेक राज्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत झाल्या. त्यामुळे सर्वत्रच खबरदारीची सूचना करण्यात आली होती. असे असतानाच आता सातारा जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या मरिआईचीवाडी आणि कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडीमधील काही कोंबड्या मृत झाल्या होत्या. या मृत कोंबड्यांचा अहवाल भोपाळ येथून प्राप्त झाला आहे. त्यानुसार मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृत कोंबड्यांच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास ३ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारण्यात येणार आहेत. तसेच त्यांची विल्हेवाट केली जाणार आहे. तर हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हणबरवाडी भागातील भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे.