‘महामेट्रोचा करारच बेकायदेशीर’- मानव कांबळे,फिडर सेवेच्या कंत्राटीकरणाविरुद्ध रिक्षा पंचायतीची निदर्शने

0
211

पिंपरी, दि. 9 (पीसीबी) – केंद्र व राज्य सरकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी महामेट्रो ही एक कम्पनी आहे. मेट्रो मध्ये जायला व मेट्रोतून आल्यावर आपल्या इच्छित स्थळी जायला प्रवासी रिक्षा वा पीएमएल चा उपयोग करू शकतात. रेल्वे,विमान,एसटी मधून प्रवास करणारे प्रवासी तशाच प्रकारे प्रवास करत आहेत. ही सेवा देणारे रिक्षा हेही एक सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. त्याला सरकारने प्रवासी वाहन परवाना दिला आहे.त्यावर राज्य शासन,परिवहन विभाग,वाहतूक पोलीस विभाग नियमन नियंत्रण करतात. महामेट्रोने पुन्हा त्यासाठी करारपत्र करण्याची व आपल्या अटी, शर्ती,दंड ठरवणे अनुचित तर आहेच शिवाय ते बेकायदेशीरही आहे.त्यामुळे त्यात न अडकता सर्व रिक्षांना मेट्रो स्थानकांवर मुक्त वाव द्यावा.असे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी आज येथे केले. मेट्रोच्या फिडर सेवेच्या कंत्राटीकरणा विरुद्ध रिक्षा पंचायतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निदर्शने केली. त्यावेळी ते बोलत होते. पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली.यावेळी राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघाचे अध्यक्ष बाबा चव्हाण, महाराष्ट्र श्रमिक ऑटो संघटनेचे नेते संजय गाढवे, महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गिरीश साबळे, क्रांती फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी अशोक मिरगे,काशीनाथ शेलार,संतोष बहुले, आत्माराम नाणेकर, तुषार पवार, सहभागी झाले होते. आभाळाची आम्ही लेकरे या कष्टकरी गीताने निदर्शनांना सुरवात झाली. मेट्रो स्टेशनवर सर्व रिक्षांना मुक्त वाव द्या, मेट्रोचे ऍप सर्व रिक्षा चालकांना उपलब्ध करा, फिडर सेवेचे कंत्राटीकरण रद्द करा आदी मागण्यांच्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या.या मागण्यांचे फलक रिक्षा चालक आंदोलकांनी हातात प्रदर्शित केले होते.

यावेळी बोलताना नितीन पवार म्हणाले, “ पिंपरी चिंचवड शहरात आता मेट्रो सुरू होत आहे. सुरुवातीला पिंपवड मनपा,संत तुकाराम नगर,भोसरी(नाशिकफटा),कासारवाडी ,फुगेवाडी अशा 5 स्थानकांवर मेट्रो सुरू होईल. मेट्रोत बसण्यासाठी यायला किंवा मेट्रोतून उतरून इच्छितस्थळी जायला दुसरे वाहन लागणार आहे. त्यासाठी गेल्या 60 हून अधिक वर्षांची प्रवासी सेवा दिलेल्या ऑटो रिक्षा शिवाय दुसरे कोणते वाहन असू शकते ?

रेल्वे,एसटी,पी.एम.एल.अगदी विमानतळावरही प्रवासी रिक्षातून जातात किंवा उलट या स्थानकात उतरल्यावर रिक्षा करून आपापल्या इच्छित ठिकाणी पोहोचतात. याकरता वरील स्थानकांवर प्रवाश्यांना पोहचवणाऱ्या आणि तेथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षांना मुक्त वाव आहे. मात्र अशा प्रकारचीच सार्वजनिक परिवहन सेवा असणाऱ्या मेट्रो स्थानकांवर महामेट्रोच्या सध्याच्या धोरणानुसार सार्वजनिक प्रवासी वाहन असणार्‍या रिक्षांना मात्र असा मुक्त वाव असणार नाही. तर महामेट्रो याकरता निवडक रिक्षा किंवा इतर वाहने उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांशी करार करत आहे. या संस्थेच्या वाहनांनाच महामेट्रो स्थानकात येता येईल किंवा तेथून बाहेर पडता येईल. मेट्रो स्टेशनवर कराराने बांधील महामेट्रोचे स्टीकर असेल अशा रिक्षा किंवा इतर वाहनांनाच परवानगी आहे प्रवासीसेवेचे हे एक प्रकारे कंत्राटीकरण असून मेट्रोच्या या धोरणामुळे ऑटो रिक्षा चालकांचे मरण ओढवणार आहे. त्याला रिक्षा पंचायतीचा आणि या मेट्रो मार्गावरील रिक्षा स्टँड सभासदांचा तीव्र विरोध आहे..यामुळे या मार्गावरील रिक्षा चालकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या इतक्या वर्षांच्या सेवेची दखल मेट्रोच्या करारामध्ये घेण्यात आलेली नाही. दरम्यान पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपवड मनपाचे वाहतूक नियोजन विभागाचे अभियंता बापू गायकवाड यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले.