महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर, प्रभागनिहाय मतदार याद्या “या” तारखेला प्रसिद्ध होणार

0
329

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यावर 17 ते 25 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर, 7 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द कराव्यात, असा आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी आज (शुक्रवारी) महापालिका आयुक्तांना दिला आहे.

5 जानेवारी 2022 ते 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या, वगळलेल्या अथवा दुरूस्त झालेले मतदार विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम करावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणुक प्रक्रिया सध्यस्थितीत वेगाने सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आता आयोगाने मतदार याद्यांचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाने विधानसभेच्या मतदार याद्यांचे विभाजन राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत करावे. विधानसभा मतदार यादीत महापालिकांच्या संबंधित प्रभागाच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे, याची खातरजमा करावी. मतदार यादीतील दुबार नावे वगळावीत. नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती व पत्त्यामधील दुरुस्ती करणे इत्यादीबाबतची कार्यवाही आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे महाऑनलाईनतर्फे तयार केलेल्या आज्ञावलीच्या मदतीने प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करावे, अशा सुचना आयोगाने दिल्या आहेत.

महापालिकेने 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करावी. 17 ते 25 जून या कालावधीत मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. 7 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द कराव्यात. त्यानंतर याद्या महापालिका कार्यालयात, संकेतस्थळावर, प्रभाग समिती कार्यालयात प्रसिध्द कराव्या, अशा सुचनाही आयोगाने दिल्या आहेत.