‘मस्करी आली अंगलट’,परळी रेल्वे स्टेशनवर मुलाच्या तोंडात फुटला सुतळी बॉम्ब

0
649

बीड,दि.२३(पीसीबी) –परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्णा-परळी-हैदराबाद रेल्वेच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये तरुणाच्या तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याची घटना घडली. तो फुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हैदराबाद पूर्णा रेल्वेमध्ये ही घटना घडली. सुतळी बॉम्ब फुटल्याचा आवाज इतका जोरात होता की ट्रेनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. जखमी तरुणाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

ट्रेन परळी रेल्वे स्थानकादरम्यान आल्यानंतर सय्यद टॉयलेटला जाण्यासाठी टॉयलेटमध्ये गेला. दरम्यान, सय्यदने आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब पकडून तो पेटवला. तो तोंडातच फुडल्यानं सय्यद गंभीर जखमी झाला.

सय्यद आक्रम (वय १९ रा.पाथरी, जिल्हा परभणी) असे जखमी प्रवाशी तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी आहे.घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तत्काळ जखमी मुलाला रेल्वेतून खाली आणले. परळी रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका रेल्वे स्थानकावर दाखल होत ते जखमी तरुणाला उपचारासाठी घेऊन गेले.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी सय्यद आक्रम हे मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत. सध्या सय्यदवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.