अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेची महिला आघाडी उत्तर देईल – संजय राऊत

0
399

मुंबई,दि.२३(पीसीबी) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेची महिला आघाडी उत्तर देईल, असं ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. त्यामुळे शिवसेना याला काय प्रत्युत्तर देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आडनाव गांधी असल्यामुळे कोणी गांधी होत नाही, असं फडणवीस म्हणाले होते. याच ट्विटला रिट्विट करत अमृता यांनी ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ यांच्यासारखे होत नाही, असं म्हटलं होतं.