मराठा समाजाने जल्लोष करावा, मुख्यमंत्र्यांनी १६ टक्के आरक्षणाचा शब्द पाळला – आमदार लक्ष्मण जगताप

0
2029

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन या समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला. भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाने जल्लोष साजरा करावा.

भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याचे विधेयक विधीमंडळाने मंजूर केले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि त्यावर राज्यपालांची सही घेतली जाईल. ही सर्व प्रक्रिय १ डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी सांगितले.”