मराठा आरक्षण अहवालासाठी विरोधकांची सरकारविरोधात हक्कभंग प्रस्तावाची सुचना

0
442

मुंबई, दि. २८ (पीसीबी) -हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण अहवालासाठी  विरोधकांनी सरकारविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विधान परिषदेत मांडली आहे. यावर विधान परिषद सभापती यांनी सूचना तपासून पाहून मंत्र्यांकडून उत्तर मागवून घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्तावाबाबत सूचना सादर केली आहे. याआधीच रणपिसेंनी हक्कभंगाची नोटीस विधानपरिषदेच्या सभापतींना पाठवली होती. शिवाय सरकारकडून मराठा अहवाल सभागृहापासून लपवला जात आहे, असा आरोप रणपिसे यांनी केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा कृती अहवाल आरक्षणाच्या विधेयकाबरोबर सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या विधेयकात कोणतीही त्रुटी राहू नये, जेणेकरुन कोणालाही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, यासाठी सरकारची महाधिवक्ता कुंभकोणी आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आणि विधेयक  गुरूवारी सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे.