मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा

0
581

औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) – राज्यात माणसे मरू लागली आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पेटला, तरी आपले सरकार काहीही करायला तयार नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र, सरकारची तशी इच्छा दिसत नाही, अशी टीका करून कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला. 

मराठा आरक्षणासाठी माझ्या मतदारसंघात लोकांना जीव दयावा लागतो, त्यामुळे माझी विधानसभेत जाण्याची इच्छा नाही. माझ्या मतदारसंघात मी राजा आहे. मला राजकारण करायचे नाही. यापूर्वी दोन वेळा राजीनामा दिला होता, आता तिसर्‍यांदा राजीमाना देत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. मराठा आरक्षण द्या नाही तर राजीनामा मंजूर करा, असेही जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषदेत सांगितले. कन्नड मधील ऱस्तासंदर्भात या आधी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी स्विकारला नाही.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत दिली होती. चार वाजेपर्यंत सरकारने अध्यादेश काढला नाही, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सरकारला सळो की पळो करून सोडेन, असेही जाधव यांनी इशारा दिला आहे.