मरकळमध्ये एकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

0
588

मरकळ, दि. २६ (पीसीबी) – कंपनीच्या जागेतील सपाटीकरणाचे काम करण्यासाठी गेलेल्या एकाला अकराजणांच्या टोळक्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान मरकळ गावाच्या हद्दीतील आय.डी.सी हिंदुस्थान प्रेसिंग प्रा. लि. या कंपनीच्या जागेत घडली.

राहुल किसन चौधरी (वय ३१, रा. गोलेगाव, ता. खेड, पुणे) असे धमकवण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर पांडुरंग लोखंडे, शुभम मुकेश लोखंडे, वाल्मीक कोतवाल, प्रशांत देविदास लोखंडे, मनोज पारखी, किरण शिवाजी लोखंडे, ओमकार मारुती लोखंडे, अभिषेक राजेंद्र  लोखंडे, अक्षय सुरेश लोखंडे, चेतन सुरेश लोखंडे, सागर दिलीप लोखंडे या अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी राहुल चौधरी हे मरकळ येथील आय.डी.सी हिंदुस्थान प्रेसिंग प्रा. लि. या कंपनीच्या जागेत सपाटीकरणाचे काम करण्यासाठी गेले होते. यावेळी वरील अकरा जणांच्या टोळक्यांनी राहुल यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी या अकराजणांच्या टोळक्यांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी शंकर लोखंडे, शुभम लोखंडे, अक्षय लोखंडे आणि वाल्मीक कोतवाल या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस निरीक्षक चौधर अधिक तपास करत आहेत.