“ममता बॅनर्जींच्या आरत्या ओवाळल्या जातायत. या हिंदूविरोधी राजकारणाचे जनता चोख उत्तर देईल”

0
231

पश्चिम बंगाल, दि.०५ (पीसीबी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपा तसंच इतर पक्षांनी केला असून तृणमूलने मात्र हे आरोप अक्षरशः फेटाळले आहेत. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात ११ कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करत भाजपाने तृणमूलला लक्ष्य केले असताना हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्यांचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला. यासर्व प्रकरणावर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनीही चीड व्यक्त केली आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले “पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते मारले जात आहेत. कथित मानवतावादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी भामटे तोंड आवळून बसलेत. ममता बॅनर्जींच्या आरत्या ओवाळल्या जातायत. या हिंदूविरोधी राजकारणाचे आम्ही चोख उत्तर देऊ. जनता देईल. आणि लक्षात ठेवा तो दिवस फार दूर नाही,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर प्रचंड प्रमाणात हिंसाचार आणि बलात्काराच्या घटना घडल्या. दरम्यान, हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.