मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

0
241

लखनऊ, दि. २१ (पीसीबी) – मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.

लालजी टंडन यांना मागच्या आठवडयात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

श्वासोश्वास करण्यास त्रास होत असल्याने तसेच तापामुळे लालजी टंडन यांना सर्वप्रथम ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते तसेच त्यांचे डायलासिस सुरु होते” असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.