सोसायटीतील कोरोना पॉझिटिव्ह महिला रातोरात दुबईला फरार, कारवाईच्या हालचाली

0
296

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फरार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ताथवडे येथील एक उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीमधील कोरोना पॉझिटिव्ह महिला केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने रातोरात फरार झाली. होम क्वारंटाईनच्या आदेशाचं उल्लंघन करुन दुबईला निघून गेलेल्या कोरोनाग्रस्त महिलेवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा ह्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित 30 वर्षीय महिलेने शनिवार 11 जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी 12 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिने गृह विलगीकरणात राहू देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मेडिकलमध्ये जात असल्याचे सांगून 17 जुलैच्या रात्री महिला सोसायटीच्या बाहेर पडली. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती परत आली नाही. त्यानंतर तिने थेट दुबईला पळ काढला. विशेष म्हणजे दुबईला पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने शारजा विमानतळावरुन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा मेसेज सोसायटीतील सदस्यांना पाठवला. सोसायटीच्या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार दिली. मात्र त्या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा सोसायटीने केला होता. त्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने तक्रार केली आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी सवाई-ढोमसे यांनी या प्रकऱणाती काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. सोसायटीची सेक्युरेटी काय कामाची, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे रिपोर्ट अचूक होते का, पोलिसांना कानोकान याची खबर कशी नाही, ज्या विमानतळावरून ती महिला दुबईला गेली तिथे यंत्रणा काय करत होती.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. काल (20 जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये 987 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11 हजार 494 वर पोहोचला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 11 कोरोनाबळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 209 वर पोहोचली आहे. रोज सरासरी ८०० च्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढतेच आहे.