मद्यधुंद पोलिसांना लघुशंका करण्यापासून हटकल्याने बापलेकीला जबर मारहाण; तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांचा दबाव

0
531

भिवंडी, दि. २६ (पीसीबी) – लघुशंका करणाऱ्या पोलिसाला हाटकल्याने दोन मद्यधुंद पोलिस आणि एका स्थानिकाने तरुणी आणि तिच्या वडिलांना जबर मारहाण केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि. २५) भिवंडीतील दापोडा येथे असलेल्या इंडियन कॉर्पोरेशनच्या प्रवेशद्वारासमोर घडली.  

शैलेश पाटील आणि जाधव असे दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर दिनेश पाटील असे स्थानिकाचे नाव आहे. या तिघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गुंदवली येथील तरुणी आणि तिचे वडील नवी मुंबई येथून ग्रामसेवक भरती परिक्षा संपवून परतत होते. दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशन येथील प्रवेशद्वाराजवळ तरुणी तिच्या वडिलांची वाट पाहात उभी होती. तेव्हा त्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोहोचले. पोलीस मुलीच्या जवळच लघुशंकेसाठी उभे राहिले. त्यावरुन तरुणीने पोलिसांना हटकले. तरुणीने पोलिसांना लघुशंकेवरुन हटकल्यानंतर आम्ही पोलीस आहोत, आम्ही कोठेही काहीही करु शकतो, असे उत्तर देत पोलिसांनी तरुणीला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी तरुणीला मारहाण केली, तिचे कपडेदेखील फाडले.

पोलीस तरुणीला मारहाण करत असताना तिचे वडील शांताराम म्हात्रे तिथे पोहोचले. यावर म्हात्रे यांनी पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी एका स्थानिकाच्या मदतीने तरुणीच्या वडीलांवरही हल्ला केला. या मारहाणीत ते जखमी झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शैलेश पाटील व त्याचा दोघा साथीदारांविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यापैकी दोघांना अटक केली आहे. दरम्यान पीडित मुलीला गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचे पीडितेने माद्यमांशी बोलताना सांगितले आहे.