मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे मी म्हटले नव्हते; पंकजा मुंडेंचे घूमजाव

0
892

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, या माझ्या विधानावर मी ठाम आहे. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे विधान मी केले नव्हते, असे घुमजाव राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात आम्ही प्रवेश करु शकणार नाही, असे जाहीर विधान करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी विधान केले होते. याबाबत विचारले असता, माझ्या विधानाचा  विपर्यास झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, धनगर समाजाचे नेते आणि विधान परिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना यावेळी मंत्रालयात प्रवेश करताना रोखून जाब विचारला. तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करत आहात. आज शब्द बदलून मंत्रालयाची पायरी चढला आहात. मात्र, २०१९ नंतर धनगर समाज तुम्हाला मंत्रालयात येण्याची वेळच येऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.