भोसरी एमआयडीसी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवट सोडलेल्या कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

0
557

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – गवळीमाथा चौक ते स्पाईन चौक दरम्यान हॉटेल साईकृपा समोर महावितरणाकडून भुमीगत विज वाहिण्या टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येथे भररस्त्यातच खोदकाम करुन विज वाहिण्या उघड्यावर ठेवल्या आहेत. तसेच हॉटेलसमोर बसवलेला वीज वाहिण्यांचा डीपी देखील उघडा ठेवला आहे. यामुळे वाहुतकीला अडथळा होत असून विजेचा धक्का लागून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांपासून या ठिकाणी खोदकाम केलेला राडारोडा तसाच पडलेला आहे. तसेच भर रस्त्यात केलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते आणि अपघात देखील होत आहेत. तर उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिण्या आणि डीपीमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो मात्र महावितरणाचे याकडे पूर्णता: दुर्लक्ष केले आहे. यामुळे मोठा अपघात किंवा दुखापत झाल्यावरच महावितरण प्रशासनाला जाग येणार का?, असा सवाल स्थानिकांनी आणि भोसरी एमआयडीसी येथील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.