भोसरीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह माती अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

0
795

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – मातीने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडल्याने एका कामगाराचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवार (दि.१२) हा अपघात झाला होता. सोमवारी (दि. २५) त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महात्मा फुलेनगर चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथे घडली.

परशुराम पांडुरंग पवार (वय ४०, रा. गणेशपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मंदा परशुराम पवार (वय २६) यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक कृष्णा शानु राठोड (वय ३३, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा हा ट्रॅक्टर (क्र. केए/३३/टी/९६१६) चालक आहे. मंगळवारी (दि.१२) महात्मा फुले नगर येथे मातीची वाहतूक करत असताना मातीने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली कृष्णाने परशुराम यांना उघडण्यास सांगितले. ट्रॉली उघडत असताना मातीसह ट्रॉली परशुराम यांच्या अंगावर पडली. यामध्ये परशुराम गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. २५) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवाडे तपास करत आहेत.