भोसरीतील कुस्ती केंद्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत – काका पवार

0
256

पिंपरी दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण उभारले आहे. यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले तरच या कुस्ती केंद्राचा उद्देश सफल होईल. त्यादृष्टीने महापालिकेने  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नेमणे आवश्यक असल्याचे मत कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केले.

 महापालिकेच्या वतीने भोसरी येथे उभारण्यात आलेल्या कुस्ती संकुलाच्या कार्यप्रणालीची रूपरेषा निश्चित करून सर्वसमावेशक धोरण ठरवण्याच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी कुस्ती क्षेत्रातील नामवंत कुस्तीगीरांसमवेत  विचार विनिमय बैठक घेतली. भोसरी येथील पै.मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या बैठकीस अर्जुन पुरस्कारार्थी कुस्तीपट्टू काका पवार, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, हिंद केसरी योगेश दोडके, उप महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, कात्रज येथील मामासाहेब मोहोळ  कुस्ती केंद्राचे ज्ञानेश्वर मांगडे, कुस्तीगीर अशोक पवार, राजेश काळभोर, बालाजी गव्हाणे, राहुल भांडवलकर, यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, माणिक चव्हाण, क्रीडा अधिकारी अनिता केदारी आदी उपस्थित होते.

महापालिकेने भोसरी येथे सुमारे 26 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. शहराची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विविध सुविधा आणि दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे असे नमूद करून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला “स्पोर्ट हब” म्हणून विकसित करण्याचे काम सुरु आहे. शहरामध्ये  राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेचे आयोजन नुकतेच केले होते. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे आता 6 राष्ट्रांची संयुक्त हॉकी स्पर्धा घेण्याबाबत महापालिकेला संधी देऊ केली आहे. थेरगाव येथील वेंगसकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेटचे मॉडेल यशस्वी झाले आहे. या ठिकाणी येत्या काळात रणजी स्पर्धा घेण्याचा मनोदय आहे. सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापनासमवेत टाय अप करून शहरातील खेळाडूंना नामांकित प्रशिक्षकांमार्फत रोईंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 टेनिस, मॅरेथॉनच्या विविध पातळीवरील स्पर्धा घेऊन शहराची क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात विविध खेळासाठी महापालिका सुविधा उपलब्ध करून देत असते. या सुविधा उपयोगात आणण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत हा प्रामाणिक हेतू असून, या संकुलाचा नियोजनबद्ध  पुरेपूर वापर कुस्ती खेळाच्या वाढीसाठी व्हावा यादृष्टीने सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच शासनाशी विचार विनिमय करून धोरण अंतिम निश्चित केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नामवंत कुस्तीगीरांसमवेत प्राथमिक बैठक घेतली जात आहे.  कुस्तीचा विकास  कशा पद्धतीने  करता येईल, कुस्ती प्रशिक्षण केंद्र कशा पद्धतीने चालले पाहिजे, याबाबत सर्व घटकांशी चर्चा करून त्यांची मते आजमावून घेणार आहोत. त्यानंतर सर्वमान्य आदर्श मॉडेल तयार करून देशातील सर्वात चांगले कुस्ती प्रशिक्षण केंद्र बनवण्याचा उद्देश असल्याचे आयुक्त पाटील म्हणाले.

योगेश दोडके म्हणाले, कुस्तीगीरांसाठी महापालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या असून सर्व घटकांचा विचार करून महापालिकेने त्यासाठी धोरण तयार करावे.