उद्योगनगरीत अडीच महिन्यात सापडले १६ अनोळखी मृतदेह

0
183

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शहरीकरणात माणसाची किंमत शून्य झाली आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून कष्टकरी दाखल होतात. मात्र, यातील अनेकजण किड्या मुंग्यांसारखी मरू लागल्याचे विदारक चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे. चालू वर्षातील मागील केवळ अडीच महिन्यात शहरातील एकूण १६ जणांचे मृतदेह मिळून आले आहेत. यातील काही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले आहेत. मृतांपैकी अनेकांना परिसरातील नागरिकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागताना किंवा भटकताना पाहिल्याची नोंद आहे. 

पिंपरी- चिंचवड शहर परिसरात चाकण, भोसरी, पिंपरी आणि तळेगाव एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत टाटा मोटर्स, महिंद्रा जनरल मोटर्स, बजाज, थरमॅक्स, फिनोलेक्स, मर्सिडीज बेंज, थिसेनक्रुप आदी नामांकित कंपन्या आहेत. तसेच, हिंजवडी आणि तळवडे येथे इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, पर्सिस्टंट, कॅपजेमिनी, स्टेरिया, सेंटल अशा माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या आशेने कष्टकरी, भटके व भिक्षेकरी शहरात दाखल होतात.  मोठी स्वप्न उराशी बाळगून शहरात दाखल होणाऱ्या सर्वांच्याच हाताला इच्छेप्रमाणे काम व पोटाला भाकर मिळत नाही. त्यामुळे शेवटी ही मंडळी व्यसनाधीनतेकडे वळतात. जे मिळेल ते खाऊन कोठेही झोपण्याची सवय त्यांना लागते. अनेकदा ही मंडळी दारू, गांजा पिऊन उपाशीपोटी तशीच झोपी जातात. सलग दुसऱ्या दिवशी अंगावर ऊन येईपर्यंत रस्त्याच्या कडेला अंगभर माशा घोंगावत असलेले अनेकजण आजही सर्रास पाहावयास मिळतात. 

रस्त्याच्या कडे पडलेल्या या व्यसनी व्यक्तींवर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसते. दरम्यान, दररोजच्या उपासमारीमुळे त्रासलेले शरीर एखाद्या दिवशी साथ सोडते. रस्त्याच्या कडेला कायम लोळत पडलेल्याचा मृत्यू झाल्याचे नागरिकांना दोन दिवसांनी जाणवते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होतात. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत ते मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातील अनेकजण वर्षानुवर्षे घर आणि नातेवाईकांच्या संपर्कात नसतात. तसेच, जवळ कोणतीही कागदपत्र नसल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याच्या अंगावरील कपड्यांवरून मृत व्यक्ती हा भिक्षेकरी किंवा भटका असल्याचा निष्कर्ष कडून दुर्लक्ष केले जाते. 

अनोळखी मृतदेह मिळाल्यानंतर पोलिस सुरुवातीला त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करतात. सदर इसमाबाबत परिसरात सखोल चौकशी देखील केली जाते. मात्र, तरी देखील ओळख पटत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावणे, जाहिरात प्रसिद्ध करणे यासारखी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. शवविच्छेदन अहवालात घातपात नसून नैसर्गिक मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिस संबंधित मृतावर अंत्यसंस्कार करतात. तत्पूर्वी मृताचे एक हाड ‘डीएनए’ चाचणीसाठी जतन करून ठेवले जाते. 

पोलिस ठाणे         अनोळखी मृतांची संख्या 

भोसरी                              – ४ 
दिघी                                –  ३ 
चाकण                              – २  
आळंदी                             – २ 
वाकड                               – २  
हिंजवडी                            – १
तळेगाव दाभाडे                   – १ 
पिंपरी                                – १