भारतीय वैमानिकाची शुक्रवारी सुखरूप सुटका; इम्रान खानची घोषणा

0
557

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी (दि.१) सुखरूप सुटका करण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (गुरूवार) पाकिस्तानच्या संसदेत केली.इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे सांगितले.

शुक्रवारी सकाळी वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावे, अशी मागणी भारताकडून करण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे, अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

गुरूवारी (दि.२७) पाकिस्तानने विमान घुसवत भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.   भारताने त्यांची विमाने पिटाळून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते, मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु झाले होते.