भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून आनंदोत्सव

0
636

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – भारतीय वायूसेनेच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मंगळवारी (दि. २६) आनंदोत्सव साजरा केला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत वंदे मातरम आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने सुद्धा याच चौकात आनंदोत्सव साजरा केला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीदांचा भारताने मंगळवारी पहाटे बदला घेतला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले केले. दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाणाऱ्या या तळांवर एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. त्यामध्ये २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे.

भारताने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करत बदला घेतला होता. आता पुलवामा हल्ल्याचाही भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला आहे. भारतीय वायूसेनेने केलेल्या या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी दुपारी आनंदोत्सव साजरा केला. नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत वंदे मातरम आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने सुद्धा याच चौकात आनंदोत्सव साजरा केला.