भारताने डोकलामपर्यंत बांधला नवा रस्ता; चीन बरोबरचे लष्करी समीकरण बदलणार

0
443

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भारताच्या सीमा रस्ते विभागाने डोकलामपर्यंत जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलाला आता सहजतेने डोकलाम खोऱ्यात प्रवेश करता येईल. दोन वर्षांपूर्वी २०१७ साली भारत, चीन आणि भूतानची सीमा जिथे मिळते त्या डोकलाममध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते.

७३ दिवसानंतर या संघर्षावर तोडगा निघाला. आता डोकलामपर्यंत जाण्यासाठी सीमा रस्ते विभागाने पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. यामुळे या भागातील लष्करी समीकरणांमध्ये मोठया प्रमाणात बदल होणार आहे. २०१७ साली पर्यायी मार्ग नसल्यामुळे भारतीय लष्कराला एकाच मार्गावरुन ट्रायजंक्शनवर पोहोचावे लागले होते. डोकलाममध्ये सैन्य तैनातीला विलंब लागला होता.

पर्यायी मार्गामुळे संघर्षाची स्थिती उदभवल्यास भारताला आता जलदगतीने हालचाली करता येतील. प्रवासाचा वेळ वाचेल त्याशिवाय तैनातीही वेगाने करता येईल. चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने १६ जून २०१७ साली डोकलाममध्ये घुसून तिथे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली.

चीनने कुठलेही बांधकाम करु नये यासाठी भारताने आपले सैन्य तिथे तैनात केले. चीन बांधकाम करुन भारत आणि भूतान बरोबरच्या कराराचे उल्लंघन करत होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी या वादावर तोडगा निघाला. बीआरओने भारत-चीन सीमेवर रणनितीक दृष्टीने महत्वाचे ३३४६ किलोमीटरचे ६१ रस्ते बांधले आहेत.