पबजी गेम खेळण्यासाठी नवा मोबाईल घेऊन न दिल्याने तरुणाची आत्महत्या

0
738

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – पबजी गेम खेळण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास मुंबई कुर्ला नेहरुनगर परिसरात घडली.

नदीम शेख (वय १९, रा. कुर्ला, नेहरुनगर, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम शेख हा कुर्ल्यातील नेहरुनगर परिसरात त्याची आई, भाऊ आणि भावाची पत्नी व भावाच्या मुलीसह राहत होता. नदीम हा त्याच्या भावाकडे महागडा मोबाइल मागत होता. त्यासाठी नदीम शेखने भावाकडे ३७ हजार रुपयांची मागणी केली. गुरूवारी रात्री यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि अखेर भावाने त्याला २० हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली. पण मला पूर्ण रक्कम हवी व तोच मोबाइल हवाय असा हट्ट धरत नदीमने ते पैसे नाकारले. या घटनेनंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास कुटुंबीय झोपायला गेले पण नदीम गेम खेळत होता. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ शौचालयाला जाण्यासाठी उठला असता किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून नदीमने आत्महत्या केल्याचे त्याला दिसले. नदीमच्या भावाने नेहरूनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेची अधिक चौकशी करत आहेत.