भाजपा कार्यकर्ते आढळराव यांना भेटले

0
293

– तुम्ही आता मागे हटू नका, लोकसभेच्या तयारीला लागा… 

शिक्रापूर, दि. २१ (पीसीबी) : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदेगटाची कास धरताच शिरुर-भाजप पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) थेट आढळरावांचे निवासस्थान गाठले. “आगामी लोकसभेच्या तयारीला आम्ही लागलो आहे, तुम्ही आता मागे हटू नका,” असे त्यांनी सांगितले.

भाजपा-शिवसेना युतीचे खासदार म्हणून तब्बल तीन वेळा शिरुरचे प्रतिनिधीत्व केलेले आढळराव एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यांच्या या निर्णयाने शिरुर-शिवसेनेत दोन उभे गट पडले आहेत.आज सकाळीच भाजपचे नेते,जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, पुणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण, घोडगंगाचे माजी तज्ज्ञ संचालक अ‍ॅड.सुरेश पलांडे, कैलास सोनवणे, शिवसेना जिल्हा संघटक अनिल काशिद, सुरेश थोरात, मुखईचे माजी सरपंच अतुल धुमाळ, रमेश पलांडे, गणेश रामगुडे, हर्षद पलांडे, दत्तात्रय भगत आदींनी आढळरावांची भेट घेतली.

आगामी राजकारणाबद्दल चर्चा करताना लोकसभा-२०२४ साठी तुम्ही तयारीला लागा अशी विनंतीही या शिष्ठमंडळाने केली.
आढळराव म्हणाले, “मी गेली अडीच वर्षे कधीच निष्किय राहिलो नाही. मात्र शिरुरमध्ये येवू घातलेल्या घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीत नवीन शिंदे-फडणवीस सरकार काय आहे ते दाखवून देणार आहे. येत्या २६ तारखेला आपण स्वत: सणसवाडी (ता.शिरूर) येथे शेतकरी ऊस उत्पादकांना भेटणार आहे,राष्ट्रवादीशी संबंध तोडा एवढेच म्हणणे सामान्य शिवसैनिकांचे आहे. राष्ट्रवादीचा त्रास ज्यांनी सहन केलाय ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिंदे गटाकडे वळत आहेत. ज्या बाळासाहेबांनी राष्ट्रवादीशी कधीच जवळीक करणार नसल्याचे सांगितले. त्या पक्षाविरोधात आपला संघर्ष काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले.

आढळरावांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मात्र महाआघाडी सारखा अजब प्रयोग थेट उद्धव ठाकरेंनी केला. भाजपा-सेना पदाधिकारी-कार्यकर्ते इच्छा नसतानाही एकमेकांपासून दूर राहिले. आगामी लोकसभेसाठी आम्ही कामाला लागलो आहोत. नव्या युतीची घोडगंगा निवडणूक ही पहिली परीक्षा आहे, लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शिरुर पुन्हा भाजपा-सेनेकडे येण्याच्या दृष्टीने आढळराव-पाटील यांची खासदारकी किती गरजेची आहे, हे सांगणार आहे, असे आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.