भाजपा आमदार महेश लांडगे यांचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीत शक्तीप्रदर्शन

0
810

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भोसरीच्या गावजत्रा मैदानावर `चला हवा येऊ द्या` या कार्यक्रमाचे आयोजनातून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भोसरीकरांची खचाखच गर्दी पाहून राष्ट्रवादीचे तमाम नेतेसुध्दा सुखावले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकिसाठी किती दणक्यात तयारी केली आहे त्याची एक झलकही पाहायला मिळाली. दरम्याण, आजवर या कार्यक्रमाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आमदार महेश लांडगे यांच्या चौखुर उधळलेल्या वारुला लगाम लागला असून भाजपाचे टेन्शन वाढले आहे. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी विविध उपक्रम व कार्यक्रमांतून एकच हवा निर्माण केली होती त्यालाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे प्रत्युत्तर मिळाले आहे.

भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, अनुराधा गोफणे, संजय वाबळे, माजी नगरसेवक जालिंदरबापू शिंदे,संजय उदावंत यांनी मिळून शरद पवार यांच्या वाढदिवसाचा उपक्रम आयोजित केला होता. त्यासाठी भोसरी गावजत्रा मैदान हे ठिकाण जाणीवपूर्वक निवडले होते. गुरुवारी सायंकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला होता. या उपक्रमाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठविण्यात सर्वात मोठे योगदान असल्याने या कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार डॉ. कोल्हे यांचा प्रवेश झाला तो मोठा चर्चेचा विषय होता. घाटात बैलगाडा जुंपल्यावर सर्वात पुढे घोडी असते. घोडीवर आरुढ झालेले डॉ. कोल्हे आणि मागे बैलगाडा अशी वाजतगाजत छोटेखाणी मिरवणूक हे मोठे आकर्षण होते. बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी संसदेत आवाज उठविला, केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला म्हणून सर्वोच्च न्यायालयातील निकाल बैलगाडा शर्यत प्रेमींसारखा लागला, त्याचे श्रेय म्हणून डॉ. कोल्हे यांना एक बैलगाडा देऊन सन्माणीत करण्यात आले. यावेळी डॉ. कोल्हे यांनी आपल्या भाषणात भोसरीकर जनतेप्रति ऋण प्रगट केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीच्या लढ्याचे श्रेय राज्यातील बैलगाडा प्रेमी शेतकऱ्यांचे आहे, असे सांगून भोसरीकरांनी दिलेला बैलगाडा आयुष्यभर जनसंपर्क कार्यालयासमोर ठेवून भोसरीकरांचे प्रेम काळजात जपेन, असा विश्वासही दिला. आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधायक कार्याचे काही दाखले दिले.
अजित गव्हाणे म्हणाले की, आम्ही भोसरीतील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आलो आहोत. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली भोसरीचा शाश्वत विकास करण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न राहणार आहे.

विलास लांडे यांची फटकेबाजी…
गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये जी ‘हवा’ करायची होती ती केली, आता हवा करण्याची बारी आमची आहे. पुणे जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर नेणारे नेतृत्व म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. पण, गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराच्या भस्मासूरांनी शहर विकून खाल्ले. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन करीत निवडणुकीच प्रचाराचे रणशिंगही फुंकले. माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपाविरोधात तुफान टोलेबाजी केल्याने आगाम काळात विलास लांडे विरुद्ध आमदार महेश लांडगे असा संघर्ष पुन्हा पेटणार असे दिसते.

कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवार यांचे योगदान प्रभावीपणे विशद करण्यात आले.
भाजपा नगरसेवक रवि लांडगे यांची उपस्थिती –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला भाजपाचे नगरसेवक रवि लांडगे यांची व्यासपीठावरील उपस्थिती हा सर्वांसाठी आश्चर्याचा विषय होता. लांडगे यांचा सन्मान हा कार्यक्रमात मोठा चर्चेचा विषय झाला होता. भाजपा सोडून रवि लांडगे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याने त्यांच्या उपस्थितीने राजकिय उलथापालथ सुरू झाल्याचा अंदाज आला.