भाजपाचे ५० आमदार संपर्कात – राऊत

0
261

मुंबई, दि. २० (पीसीबी) : महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याता दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. कारण या दाव्यावरून महाविकास आघाडीतील नेते आता दानवेंचा समाचार घेत आहेत. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दानवेंवर खोचक टीका केली. रावसाहेब दानवे भांग तर पीत नाहीत, माझे चांगले मित्र आहेत ते, दिल्लीत ते माझ्या बाजुला राहतात. मात्र त्यांनी हा दावा कोणत्या नशेत केला? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तसेच त्यांना २५ नाही तर १७५ आमदार आमच्या संपर्कात आहेत असे बोलायचे असेल. स्पीप ऑफ टंग झाली असेल, आहेत संपर्कात तर घ्यांना, थांबलाय कसासाठी? असा सवालही त्यांनी केलाय. तसेच उद्या मी म्हणतो भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असेही राऊत म्हणाले आहेत.

भाजपचे राऊतांना प्रतिआव्हान
त्यावर भाजप नेते मोहीत कंबोज यांनी ट्विट करत लगेच संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. ५० आमदार काय पाच नगरसेवक तर फोडून दाखवा, असे थेट आव्हान कंबोज यांनी राऊतांना दिलं आहे. तसेच राऊतांच्या आडनावाचा उल्लेख त्यांनी राऊट असा केलाय.

भाजप नेते रावासाहेब दानवे यांचं नाराज आमदारांबाबतचं वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, या म्हणीसारखं आहे, असा टोला शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. खासदार संजय राऊत यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे २५ आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधील २५ आमदार बहिष्कार घालणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढली गेली, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यावरच या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.