“भाजपला मतदान करु नका”, सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

0
609

डेहराडून, दि. १० (पीसीबी) – उत्तराखंडमधील डेहराडून येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहिली असून त्यामध्ये “भाजपला मतदान करु नका”, असे आवाहन नागरिकांना केले आहे.  

ईश्वरचंद शर्मा (वय ६५, रा. उत्तराखंड, हरिद्वार) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.८ एप्रिल) ईश्वरचंद शर्मा यांनी राहत्या घरात विष प्राषण करून आत्महत्या केली. तसेच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली होती. ज्यामध्ये ‘भाजप सरकारने गेल्या ५ वर्षांत शेतकऱ्यांना बरबाद केले आहे. त्यांना मतदान करू नका, अन्यथा ते सर्वांना चहा विकायला लावतील’, असे लिहिले आहे. हे पत्र पोलिसांनी जप्त केले आहे. सध्या या पत्राची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आधीच कर्जबाजारी झालेले शर्मा यांना एक एजंट ब्लॅकमेल करत होता. त्यांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी त्याला गॅरन्टर म्हणून एक ब्लँक चेक दिला होता. त्याच चेकवरून पीक विक्रीनंतर आलेला बँकेतील सर्व पैसा काढून घेऊ अशा धमक्या तो एजंट शर्मा यांना देत होता. पोलिसांनी यासंदर्भात सुद्धा चौकशी सुरू केली आहे.