भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण

0
391

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास महेशनगर चौपाटी सर्कल जवळ, संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.

महेश शामराव मांजाळकर (वय 35, रा. मांजाळकर चाळ, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल ओव्हाळ (वय 23), अतुल डोंगरे (वय 21, दोघे रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी निखिल आणि अतुल यांचे अनोळखी व्यक्ती सोबत भांडण सुरू होते. त्यामुळे फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून आरोपी अतुल याने गाडीच्या चावीने फिर्यादी यांच्या डोळ्याला ठोसा मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.