भय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार

0
2174

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यांनी आत्महत्या घरगुती वादातून नव्हे तर ब्लॅकमेलींच्या प्रकरणाला वैतागून केल्याची तक्रार महाराजांची पत्नी आयुषी आणि कन्या कुहूने थेट पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांच्याकडे केली आहे.

मंगळवार (दि.१२) जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदूर येथील सिल्व्हर स्प्रिंग टाऊनशिपममध्ये लायसेंस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुरुवातीला त्यांनी दुसरी पत्नी आयुषी आणि कन्या कुहूच्या सततच्या भांडणाला वैतागून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र आज या प्रकरणाला वेगळेच वळून मिळाले. याप्रकरणी आयुषी आणि कुहू पहिल्यांदाच समोर आले. त्यांनी भय्यूजी महाराजांनी आत्महत्या घरगुती वादातून नव्हे तर ब्लॅकमेलींच्या प्रकरणाला वैतागून केल्याची तक्रार पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांच्याकडे केली.

या तक्रारीमध्ये महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप दोघींनी केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आधीचा ड्राइव्हर कैलाश पाटील याला या सगळ्या षड्यंत्रांची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे. त्यामुळे त्याचा जबाब कलम १६४ च्या अंतर्गत नोंदवण्यात यावा. अशी मागणी आयुषी आणि कुहूने केली आहे.