मेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी  

0
687

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राज्यात मेगाभरती घेण्यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने केली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल केली आहे. या याचिकेला ५२ विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे, असे  महासंघाचे सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले.

राज्य सरकारने  मेगाभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत मराठा समाजाला १६ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. ७० हजार पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. मात्र, ही भरती कंत्राटी पद्धतीने आणि बाहेरच्या एजन्सीमार्फत केली जाणार आहे.  या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्यात सध्या ३ लाख कंत्राटी कर्मचारी १ ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यात मराठा समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आधी सेवेत घ्या, असे या याचिकेत म्हटले आहे. त्यांना कामाचा अनुभवही आहे. याच कर्मचाऱ्यांना सध्या कार्यरत असणाऱ्या पदांवर समायोजित करून घ्यावे. त्यामुळे  प्रशिक्षण, वेळ आणि पैशाची बचत होणार आहे, असे संघटनेने म्हटले आहे.