बेरोजगारीला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरात तीन जणांनी गळफास घेतला

0
352

 

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) –  बेरोजगारी, पैशाची चणचण, काैटुंबिक कलह अशा विविध कारणांमुळे पुणे आणि  पिंपरी- चिंचवड शहरात सुरु झालेले आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आठवड्यापुर्वी दोन आयटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. पुणे शहरात एकाच कुटुंबातील चाैघांनी गळफास घेतला. एका सुताराने आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 23) पिंपरी चिंचवड शहरात तीन जणांनी गळफास घेतल्याचे समोर आले आहे. या तिघांनीही बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

विश्‍वंभर केशव शिंदे (वय 40, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे वाकड येथे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे कामगार असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, त्यांनी सोमवारी रात्री वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहती समोरील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सातच्या सुमारास एका पादचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दुसऱ्या घटनेत अक्षय रामचंद्र बनसोडे (वय 27, रा. पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) या तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना उघकीस आली. अक्षय हा एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे दोन अडीच महिन्यांपासून तो घरीच होता. दरम्यान, सोमवारी रात्री त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत निगडी येथील पीसीएमसी कॉलनीत एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. संबंधित व्यक्‍ती हा लॉकडाऊनपूर्वी शहरात आला होता. दोन तरुणांसोबत तो राहण्यास होता. त्याच्याही हाताला काम नव्हते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या इसमाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

गुजराथ राज्यात एकाच कुटुंबातील सहा जणांनी गळफास घेतल्याचे उघड झाल्यावर मोठी खळबळ माजली. देशात विविध राज्यांतून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या बातम्या आहेत. मुंबईत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपट क्षेत्रात उलटसुलट चर्चा झाली. देशभरातील माध्यमांतून सुशांतच्या आत्महत्येवर बराच वेळ मंथन झाले. मीडियाने अशाच पध्दतीने अन्य क्षेत्रातील आत्महत्यांबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. सतत आत्महत्यांच्या बातम्यासुध्दा समाजमनावर परिणाम करतात, असाही निष्कर्ष पुढे आला आहे.