बापरे! पेट्रोल पंपाचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने ‘अशी’ झाली पावणेआठ लाखांची फसवणूक

0
280

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – एका अनोळखी इसमाने मोशी प्राधिकरण येथील एका व्यापाऱ्याला पेट्रोल पंपाचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने वारंवार फोन करुन सात लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना डिसेंबर 2020 ते 17 एप्रिल 2019 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.

स्वामीनाथ राजवंशी सिंग (वय 49, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आठ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी इसमाने 8515089177 या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी यांना वारंवार फोन केला. पेट्रोल पंपाच्या लायसन्ससाठी, एनओसी करिता आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून सात लाख 80 हजार 600 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना लायसन्स न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.