फ्रीज आणि सोफा खरेदीच्या बहाण्याने 95 हजारांची फसवणूक : ओएलएक्सवरील जाहिरात पडली महागात

0
266

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – एका महिलेने घरातील सोफा आणि फ्रीज विकण्याबाबत ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्याद्वारे एका व्यक्तीने संपर्क करून जाहिरात देणा-या महिलेची 95 हजारांची फसवणूक केली. ही घटना 4 एप्रिल रोजी सकाळी वाकड येथे घडली.

श्वेता रोहित देशमुख (वय 38, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6003470061 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील फ्रीज सहा हजार रुपयांना आणि सोफा सेट 13 हजारांना विकायचे असल्या बाबत ओएलएक्सवर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. आरोपीला फिर्यादी यांचा फ्रीज आणि सोफा विकत घ्यायचा असल्याचे सांगून फिर्यादी यांना पेमेंट केल्याचे स्क्रीनशॉट पाठवले. फिर्यादी महिलेच्या खात्यातून सुरुवातीला 19 हजार रुपये, त्यानंतर 19 हजार आणि पुन्हा 19 हजार रुपये कमी झाले. आरोपीने त्याच्या बँक खात्यात फिर्यादी यांचे 57 हजार रुपये आले असून ते परत पाठवण्यासाठी एक क्युआर कोड फिर्यादी महिलेला पाठवला. तो क्यूआर कोड स्कॅन केला नसताना देखील फिर्यादी यांच्या बँक खात्यातून आणखी काही रक्कम कमी झाली. एकूण 95 हजार रुपयांची आरोपीने फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.