फटाके वाजविण्यावरून झालेल्या वादातून तिघांवर हल्ला

0
222

पिंपरी, दि.०८ (पीसीबी) : फटाके वाजवताना फटाक्यांच्या ठिणग्या लगतच्या घरावर गेल्याच्या कारणावरून तिघांवर दांडक्याने व दगडाने हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण येथील आगरकरवाडी रस्त्यावरील विघ्नहर्ता सोसायटीत हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुनंदा बोरसे ( वय – ३८, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आगरकरवाडी, रस्ता चाकण.) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या हाणामारीत सुनंदा यांच्यासह त्यांचा मुलगा विवेक बोरसे ( वय – १८ ), व महेश लीलाचंद कोळी हे जखमी झाले आहेत. तर सुनंदा यांच्या फिर्यादी वरून चैताली अनिल मोरडे, अनिल बबन मोरडे व सुनिता अनिल मोरडे ( रा. चाकण ) यांच्यावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाळीच्या सणामुळे रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान बोरसे कुटुंबातील सदस्य राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत फटाके वाजवत होते.

त्यावेळी फटाक्याची ठिणगी समोरच्या घरालगत गेली. त्यामुळे आग लागण्याची भीती मोरडे यांना वाटली. त्यामुळे ते चिडले व सुनंदा यांच्यासह त्यांचा मुलगा विवेक व भाऊ महेश यांना शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण जखमी केले. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी बोरसे व मोरडे यांच्यात घरासमोर टाॅवर बसविण्याच्या कारणावरून वाद झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद धुमसत होता. त्याचे पर्यवसन बुधवारी तुफान हाणामारीत झाले. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.